जखमी बैलांसह बाळा जगताप थेट बीडीओंच्या दालनात! निकृष्ट पांदन रस्त्याविरोधात अनोखे आंदोलन

आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमदारांच्या घरासमोर आमरण उपोषणाचा इशारा; एकाच ठेकेदाराला ५७ पांदन रस्त्यांची कामे दिल्याचा आरोप
आर्वी | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात मौजा नांदपूर येथील पांदन रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात काँग्रेस नेते तथा प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या निकृष्ट गिट्टीमुळे शेतीपयोगी बैलांच्या खुरांना गंभीर दुखापत होत असल्याचा आरोप करीत, जखमी बैलांसह थेट पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्या दालनात अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात एकच चर्चा रंगली.

मौजा नांदपूर येथील पांदन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या गिट्टीमुळे बैलांच्या खुरांना दुखापत होऊन ते रक्तबंबाळ होत असल्याचे जगताप यांनी आंदोलनादरम्यान निदर्शनास आणून दिले. शेतीच्या कामासाठी बैलांना याच रस्त्यावरून न्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांचेही हाल होत आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जगताप यांनी जखमी बैलांसह थेट गटविकास अधिकारी आर्वी यांच्या दालनात धडक दिली. या अभिनव आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित रस्त्याची पाहणी करून आठ दिवसांत समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

मात्र, आठ दिवसांच्या निर्धारित कालावधीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आर्वीच्या आमदारांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बाळा जगताप यांनी दिला आहे.
एकाच ठेकेदाराला ५७ रस्त्यांची कामे? चौकशीची मागणी
या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराला तब्बल ५७ पांदन रस्त्यांची कामे देण्यात आल्याचा आरोप बाळा जगताप यांनी केला. त्यामुळे केवळ नांदपूर येथील रस्त्याचीच नव्हे, तर ठेकेदाराने केलेल्या सर्व ५७ कामांची गुणवत्ता तपासून सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या आंदोलनादरम्यान बाळा जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, तर गटविकास अधिकारी श्री. इंगोले यांनी प्रशासनाची बाजू मांडली.
बाईट : बाळा जगताप – संस्थापक अध्यक्ष, प्रहार सोशल फोरम
बाईट : श्री. इंगोले – गटविकास अधिकारी, पंचायत समिती आर्वी



