वाशिममध्ये ट्रक आणि पोकलँड मशीनला भीषण आग; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान!

वसारी ते शिरपूर जैन मार्गावरील घटना; नागरिकांनी विहिरीतून पाणी आणत आगीवर मिळवले नियंत्रण, सुदैवाने जीवितहानी टळली
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वसारी ते शिरपूर जैन मार्गावर ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने ट्रकमध्ये ठेवलेल्या पोकलँड मशीननेही पेट घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी जवळच्या विहिरीतून पाईपच्या साहाय्याने पाणी आणून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दरम्यान, या आगीमध्ये ट्रक आणि त्यामध्ये ठेवलेल्या पोकलँड मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भररस्त्यावर ट्रक आणि पोकलँड मशीनला आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



