तापी नदीत बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; सोनाबर्डी गावावर शोककळा

मित्रासोबत पोहण्यासाठी गेला अन् बेपत्ता झाला; रात्रभर शोधमोहीम, बुधवारी सकाळी आढळला मृतदेह
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील सोनाबर्डी येथे तापी नदीत बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवराज दादू जांभेकर हा इयत्ता अकरावीत शिकत होता. मंगळवारी सायंकाळी मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेला शिवराज पाण्यात बेपत्ता झाला होता. रात्रभर शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागला नाही. अखेर बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह नदीत आढळून आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
धारणी : तापी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोनाबर्डी येथे घडली. शिवराज दादू जांभेकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होता. या घटनेने जांभेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवराज मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत गावालगत असलेल्या तापी नदीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो अचानक पाण्यात बेपत्ता झाला. ही बाब लक्षात येताच परिसरात शोधाशोध सुरू करण्यात आली. घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आली.
धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. शिवराजचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. मात्र, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही.
दरम्यान, बुधवारी सकाळी गावकऱ्यांना नदीत शिवराजचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या डीडीआरएफच्या पथकाने मृतदेह नदीबाहेर काढला. पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह धारणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
अल्पवयीन विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे सोनाबर्डी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवराजच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी धारणी पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.



