शिक्षक मतदारसंघाच्या डमी मतपत्रिकेवरील फोटोवर आक्षेप; अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार

ओळखपत्रावर बनियनमधील फोटो, तर डमी मतपत्रिकेवर शर्टमधील फोटो वापरल्याचा दावा; योग्य फोटो वापरण्याची उमेदवाराची मागणी
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उपेंद्र बाबाराव पाटील यांनी डमी मतपत्रिकेवरील छायाचित्राबाबत आक्षेप नोंदवला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना ओळखपत्र आणि डमी मतपत्रिकेसाठी बनियनमधील दोन छायाचित्रे दिली होती. मात्र, ओळखपत्रावर बनियनमधील फोटो वापरण्यात आला असताना डमी मतपत्रिकेवर शर्टमधील फोटो वापरण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून योग्य छायाचित्र वापरण्याची मागणी केली आहे.:

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान डमी मतपत्रिकेवरील छायाचित्रावरून नवा आक्षेप समोर आला आहे. अपक्ष उमेदवार उपेंद्र बाबाराव पाटील यांनी यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
पाटील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या वेळी ओळखपत्र आणि डमी मतपत्रिकेसाठी प्रत्येकी एक अशी दोन छायाचित्रे मागवण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी दोन्ही कामांसाठी बनियनमधील छायाचित्रे दिली होती.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता झालेल्या बैठकीदरम्यान त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रावर बनियनमधील छायाचित्र वापरण्यात आले होते. मात्र, सात-ब अर्थात डमी मतपत्रिकेवर त्यांचा शर्टमधील छायाचित्र वापरण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
डमी मतपत्रिकेसाठी आपण बनियनमधील छायाचित्र दिले असताना दुसरे छायाचित्र वापरण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. संबंधित छायाचित्र चुकीचे असल्याचे सांगत, आपण सादर केलेले छायाचित्रच डमी मतपत्रिकेवर वापरण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
या प्रकरणी उपेंद्र बाबाराव पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे. डमी मतपत्रिकेवरील छायाचित्राची तपासणी करून योग्य छायाचित्र वापरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



