Amaravti GraminamravaticitynewsCrime News

अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थ आक्रमक! सोनोरीत आमरण अन्नत्याग उपोषण सुरू

प्रशासनाला निवेदने देऊनही कारवाई नसल्याचा आरोप; गावातील बेकायदेशीर दारूविक्री बंद करण्याची मागणी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे अवैध दारूविक्रीच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गावात गावठी, देशी आणि विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

सोनोरी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार तसेच ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्याकडे निवेदने सादर केली होती. मात्र, या तक्रारींनंतरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावातील मुख्य बसस्थानक चौकात उपोषण सुरू केले असून, गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.

गावातील बेकायदेशीर दारूविक्री तातडीने बंद करावी, दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि अवैध दारूसाठे जप्त करावेत, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. गावातील अवैध दारूविक्रीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सोनोरीतील ग्रामस्थांनी आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केल्याने आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांच्या आरोपांची चौकशी करून अवैध दारूविक्रीविरोधात ठोस कारवाई केली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button