Amravaticitynews

श्री अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पहाटे अभिषेकानंतर मंदिराचे प्रवेशद्वार खुले; डॉग स्क्वॉड आणि बॉम्बशोधक पथकाकडून सुरक्षा तपासणी

विदर्भवासीयांची कुलस्वामिनी आणि अमरावतीचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता अभिषेक पार पडल्यानंतर मंदिराचे प्रवेशद्वार भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजता देवीची आरती करण्यात आली. या आरतीला शेकडो भाविकांनी उपस्थिती लावत आई अंबादेवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, अमरावतीसह विदर्भातील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री अंबादेवी संस्थानकडून दर्शन व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वारातून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात असून, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मेटल डिटेक्टर आणि बॅरिकेड्सच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरात विशेष खबरदारी घेतली जात आहे. डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली, तर बॉम्बशोधक आणि नाशक पथकानेही परिसराची पाहणी केली. या तपासणीदरम्यान पोलीस विभागाच्या श्वानाने अंबादेवी मातेला नमन केल्याचे दृश्यही पाहायला मिळाले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी प्रवचनमाला, तर दिवसभर भजन कल्लोळाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.

नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात १९ ऑक्टोबर रोजी नवचंडी यागाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी पारंपरिक सीमोल्लंघन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांसाठीही भाविकांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शिस्तीने रांगेतून दर्शन घ्यावे, नियमांचे पालन करावे आणि सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थान व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भक्ती, श्रद्धा आणि कडक सुरक्षा व्यवस्थेच्या वातावरणात अमरावतीतील शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button