नांदगाव खंडेश्वरमध्ये ईद मिलाद उन नबीचा भव्य जुलूस

मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजन; उत्साह, शांतता आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात सोहळा संपन्न
नांदगाव खंडेश्वर : ईद मिलाद उन नबीच्या निमित्ताने नांदगाव खंडेश्वर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य जुलूस काढण्यात आला. फैयाज गरीब नवाज मस्जिदपासून सुरू झालेला हा जुलूस बुधवारा चौक मार्गे बस स्टॉप परिसरात पोहोचला. त्यानंतर पुन्हा मस्जिद परिसरात परत येत जुलूसाची शांततेत सांगता करण्यात आली.
जुलूसामध्ये लहान मुलांपासून युवक आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने समाजबांधव उत्साहाने सहभागी झाले होते. संपूर्ण जुलूसादरम्यान ईद मिलाद उन नबीचा उत्साह आणि सामाजिक भाईचाऱ्याचे वातावरण पाहायला मिळाले.

जुलूसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जुलूसादरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळली.
यावेळी पोलीस ठाणेदार आनंद पिदुंरकर, एपीआय सोनली मेश्राम, पीएसआय आशिक शेख, पीएमआय सम्राट ब्राह्मणे, पीएसआय लक्ष्मी मॅडम, निखिल मेठे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी जुलूसात सहभागी मुस्लिम समाजातील नागरिकांना ईद मिलाद उन नबीच्या शुभेच्छा दिल्या.
जुलूसामध्ये हाजी अली मोहम्मद, शफी सेठ लध्धाणी, मोहम्मद हारुण भाई, हारुण सेठ लध्धाणी, हाजी फिरोज सेठ, समीर शेख, सोनू सेठ, शेख अन्सार, अब्दुल राजीक, परवेज लध्धाणी यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे जुलूस शांततेत पार पडला. धार्मिक उत्साहासोबतच शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देत नांदगाव खंडेश्वरमध्ये ईद मिलाद उन नबीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.



