अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेचा निषेध

नवजागरण मनिशी क्रांतिकारी समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संतापाची लाट कायम आहे. या घटनेचा निषेध करत नवजागरण मनिशी क्रांतिकारी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
एसएनसीयू विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलकांनी नवजात शिशूंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यवस्थेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेत नेमक्या कोणत्या त्रुटी होत्या, दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी काय, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी भूमिका समितीने मांडली.
तीन निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू ही अत्यंत गंभीर घटना असून, केवळ चौकशी जाहीर करून प्रकरण थांबवू नये. दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनामुळे अमरावतीतील स्त्री रुग्णालय दुर्घटनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून पुढील काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



