ठाण्यात रक्षाबंधनाचा उत्साह; आनंद आश्रमात हजारो बहिणींची गर्दी

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून महिला दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधली राखी
ठाणे : रक्षाबंधनाच्या निमित्ताने ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील आनंद आश्रमात उत्साह आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून हजारो महिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी आनंद आश्रमात दाखल झाल्या. दुपारी एक वाजल्यापासूनच महिलांची मोठी गर्दी आणि लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

रक्षाबंधनानिमित्त एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लाडक्या बहिणी आनंद आश्रमात पोहोचल्या. आपल्या भावाला राखी बांधण्याचा उत्साह महिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता.
या विशेष कार्यक्रमासाठी आनंद आश्रम परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याने परिसरात रक्षाबंधनाचा उत्साह निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थित बहिणींकडून राखी बांधून घेत त्यांचे अभिवादन स्वीकारले.
विशेष म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावत एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, खासदार नरेश म्हस्के, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हजारो महिलांच्या उपस्थितीमुळे आनंद आश्रम परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिण-भावाच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा संदेश देणारा हा सोहळा ठाण्यात विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.



