केडीके टी पॉईंटवर एमडीसह तरुणाला अटक; 1.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ची कारवाई; 10.090 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, महिला आरोपीचा शोध सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडीके टी पॉईंट परिसरात कारवाई करत एमडी अर्थात मेफेड्रोनसह एका आरोपीला अटक केली आहे.
20 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाला केडीके टी पॉईंट परिसरात संशयित व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संशयिताची दोन पंचांसमक्ष झडती घेतली.
झडतीदरम्यान आरोपीकडून 10.090 ग्रॅम एमडी, अंदाजे किंमत 1 लाख रुपये, जप्त करण्यात आला. याशिवाय 25 हजार रुपये किमतीचा सॅमसंग फोल्डिंग मोबाईल, 50 हजार रुपये किमतीची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड आणि 3 हजार 520 रुपये रोख जप्त करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण 1 लाख 78 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणात नूर मोहम्मद उर्फ मोबीन फिरोज खान, वय 24 वर्षे, याला अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील आणखी एका महिला आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्यातील कलम 8(क), 22(ब) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 आणि नंदनवन पोलीस पुढील तपास करत आहेत.



