मुथूट फिनकॉर्प सोने तारण प्रकरणात मोठी कारवाई; १.२६ किलो सोने जप्त

सुवर्णकार निलेश चेडेकडून १ कोटी ८९ लाखांचे सोने हस्तगत; सुमारे ३ किलो सोने तारण ठेवणारा करुले फरार
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील मुथूट फिनकॉर्पच्या सोने तारण प्रकरणात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सुवर्णकार निलेश चेडे याच्याकडून तब्बल १ किलो २६० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या सोन्याची किंमत सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक सुवर्णकार करुले फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
ग्राहकांच्या तारणातील सोन्याचा गैरवापर केल्याचा आरोप
महाजनपुरा परिसरातील रहिवासी शिलिनी काशीनाथ नागरगोजे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या तपासानुसार, ग्राहकांनी मुथूट फिनकॉर्पकडे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने संबंधित कर्मचाऱ्यांनी परस्पर काही सुवर्णकारांकडे गहाण ठेवून त्यातून मोठी रक्कम उभी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात शाखा व्यवस्थापक शुभम रविंद्र वासेवाय, सूरज अनिलराव खेरकर आणि धीरज पंचमराव सिरसाट या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंत अनेक ग्राहकांच्या तक्रारी
या प्रकरणात आतापर्यंत सुमारे ६० ग्राहकांच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. अटकेतील आरोपींच्या चौकशीत शहरातील विविध सुवर्णकारांकडे सुमारे ४ किलो सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर पोलिसांनी संबंधित सुवर्णकारांचा शोध सुरू केला. यापूर्वी दोन सुवर्णकारांकडून सुमारे ९० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते.
निलेश चेडेकडून १ किलो २६० ग्रॅम सोने जप्त
तपास पुढे नेत पोलिसांनी सुवर्णकार निलेश चेडे याचा शोध घेतला. त्याच्याकडून १ किलो २६० ग्रॅम सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या सोन्याची अंदाजे किंमत १ कोटी ८९ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आणखी एका सुवर्णकाराकडे गहाण ठेवण्यात आलेले सुमारे ३ किलो सोने अद्याप जप्त झालेले नाही. संबंधित सुवर्णकार करुले फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास सुरू आहे.
आणखी किती सोने जप्त होणार?
मुथूट फिनकॉर्पच्या या प्रकरणात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र, या प्रकरणात आणखी किती सोने तारण ठेवण्यात आले आहे आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास अद्याप सुरू आहे.
फरार सुवर्णकार करुलेचा शोध लागल्यानंतर या प्रकरणातील आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
बाईट — शाम घुगे, पोलीस उपायुक्त, अमरावती
मुथूट फिनकॉर्पच्या सोने तारण प्रकरणातील तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे जप्त होणाऱ्या सोन्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी किती रक्कम आणि किती सोन्याचा गैरव्यवहार झाला, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.



