धारणीत पुन्हा घरफोड्यांचा धुमाकूळ; सिव्हिल लाईनमधील चार ते पाच घरे फोडली

वारंवारच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रभावी तपासाची मागणी
धारणी (अमरावती) | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली आहे. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील चार ते पाच घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सिव्हिल लाईन परिसरातील बंद घरांना लक्ष्य करत कुलपे तोडून घरफोडी केली. चोरीत किती माल लंपास झाला याचा तपशील पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, धारणी शहरात गेल्या काही वर्षांत घरफोडी आणि चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बिअर बारमधील चोरी, निता नगर परिसरातील घरफोड्या तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालयातील कागदपत्र चोरीसारख्या घटनांचीही परिसरात चर्चा होत आहे. या प्रकरणांपैकी काहींचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, हृदयविकाराने निधन झालेल्या रेडिमेड वस्त्र व्यावसायिक गजुभाऊ पांडे यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, शहरात रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि घरफोडीच्या घटनांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. चोरीमागील आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक आणि अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना कितपत यश मिळते, याकडे संपूर्ण धारणीकरांचे लक्ष लागले आहे.



