ऑटोचालक हत्या प्रकरणाचा उलगडा; सात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

लूटमारीला विरोध केल्याचा आरोप; मानकापूर पोलिसांनी गुन्ह्याची पुनर्रचना करत आरोपींची धिंड काढली
नागपूर | प्रतिनिधी
नागपूरातील गोरेवाडा–पिटेसुर रोड परिसरात ऑटोचालक मोहम्मद काशिद यांच्या हत्या प्रकरणाचा मानकापूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. लूटमारीदरम्यान विरोध केल्यामुळे ही हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा असून या प्रकरणातील सर्व सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेवाडा–पिटेसुर रोड परिसरात ऑटोचालक मोहम्मद काशिद यांच्यावर लूटमारीचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी विरोध केल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मानकापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी काही दिवसांतच सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यश उर्फ गावंडे, नवीन उईके, समीर उर्फ पाजी उईके, सुलभ उर्फ राज ठाकूर, संजय उर्फ निलेश जोगी, रोहित जगदाले तसेच एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. त्यानंतर परिसरात आरोपींची पैदल धिंड काढण्यात आली. या कारवाईमागे गुन्हेगारांमध्ये कायद्याबाबत धाक निर्माण करणे आणि गंभीर गुन्ह्यांविरोधात कठोर भूमिका असल्याचा संदेश देणे हा उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर आरोपींवरील आरोपांची सत्यता निश्चित होणार आहे. दरम्यान, या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांच्या तपासातील नागपूर पोलिसांच्या तत्परतेची चर्चा सुरू झाली आहे.



