BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

मेहकरमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचा पालिकेवर मोर्चा; पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप

पर्यायी जागेची मागणी; प्रशासनाकडून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन

मेहकर | प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता विक्रेत्यांची दुकाने हटवल्याचा आरोप करत संतप्त विक्रेत्यांनी नगरपालिकेत धडक देत न्यायाची मागणी केली. श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांच्या नेतृत्वाखाली महिला व पुरुष विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या.

विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, नागसेन चौक, जानेफळ रोड आणि शेट्टी पेट्रोल पंप परिसरात अनेक कुटुंबे रस्त्याच्या एका बाजूला भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होती. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपालिकेने अचानक कारवाई करून दुकाने हटवल्याने अनेक कुटुंबांचा रोजगार बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे उपजीविकेचे साधन हिरावल्याचा दावा विक्रेत्यांनी केला. त्यांनी प्रशासनासमोर आपली बाजू मांडताना मुख्य आठवडी बाजार परिसरात अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांमुळे तेथे व्यवसाय करणे कठीण असल्याचे सांगितले. त्यामुळे पर्याय नसल्याने शहरातील विविध ठिकाणी भाजीपाला विक्री करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी योगेश सौभागे यांनी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी विक्रेत्यांना पूर्वसूचना देणे, पर्यायी जागेची व्यवस्था करणे आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून निर्णय घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली. गोरगरीब विक्रेत्यांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेत या प्रश्नावर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.

आता नगरपालिकेकडून भाजीपाला विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाते का आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे मेहकर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विक्रेत्यांनी केलेल्या आरोपांबाबत नगरपालिकेची सविस्तर भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button