अमरावतीतील विकासकामांना वेग; आयुक्त वर्षा लड्डा यांची प्रत्यक्ष पाहणी

अमरावती शहरातील विकासकामांना आता वेग येताना दिसत आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज सकाळी शहरातील विविध रस्ते विकासकामे आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
शहरातील विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांमुळे प्रलंबित प्रकल्पांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाहणी दौऱ्याची सुरुवात बियाणी चौक ते इर्विन चौक या महत्त्वाच्या मार्गापासून करण्यात आली. या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले असून आयुक्तांनी कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली.
यानंतर प्रभाग क्रमांक १८ मधील दस्तुरनगर ते छत्री तलाव मार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याची एकूण लांबी १,००० मीटर असून सध्या ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
त्यानंतर आयुक्तांनी मानवी अपार्टमेंट ते अकोली टी पॉईंट या वर्दळीच्या मार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. या रस्त्याची लांबी २,२०० मीटर असून सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम गतीमान व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय सातुर्णा ते अकोली रेल्वे टी पॉईंट मार्गावरील काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉक आणि नाली बांधकामाचीही पाहणी करण्यात आली. यावेळी तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून काम पूर्णत्वास नेण्याचे निर्देश देण्यात आले.
रस्ते विकासकामांच्या पाहणीनंतर आयुक्तांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरू असलेल्या गृहप्रकल्पांचाही आढावा घेतला. बेनोडा परिसरातील सदनिकांची पाहणी करून रहिवाशांशी संवाद साधण्यात आला. प्रकल्पातील मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आपला आर्थिक हिस्सा जमा केलेला नसल्याने प्रकल्पाच्या कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना १० जूनपर्यंत आवश्यक रक्कम जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा प्रतीक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शहरातील रस्ते व गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, आयुक्त वर्षा लड्डा यांच्या पाहणीमुळे विकासकामांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



