यमुना नदीत बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मथुरा (उत्तर प्रदेश) : यमुना नदीत एक मोठी दुर्घटना घडली असून, प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याने किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट वृंदावन आणि आसपासच्या भागांदरम्यान सुमारे ३० प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान, बोट नदीवर उभारलेल्या लोखंडी पाँटून पुलाला धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या बोटीत पंजाबमधील भाविक प्रवास करत होते. अपघातानंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले असून, आतापर्यंत सुमारे १८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. काही जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मथुराचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप काही प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दुर्घटनेमागील नेमके कारण तपासले जात आहे.



