citynewsLatest NewsMaharashtraSatara

‘कोयना-दौलत डोंगरी महोत्सवा’ला भव्य सुरुवात! पर्यटन, संस्कृती आणि साहसाचा अनोखा संगम – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा | प्रतिनिधी
डोंगरी भागातील नागरिकांना विविध संस्कृतींचा अनुभव देणारा ‘कोयना-दौलत डोंगरी महोत्सव’ पाटण तालुक्यातील नाडे येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशानी नागराजन, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पंचायत समिती सभापती सरिता पवार, उपसभापती विजय पवार, विजयादेवी देसाई, यशराज देसाई, रवीराज देसाई, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले की, या महोत्सवामुळे डोंगरी भागातील नागरिकांना राज्यातील विविध भागांतील संस्कृती, खाद्यपदार्थ आणि कला यांचा अनुभव घेता येणार आहे. तसेच जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांचाही लाभ या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

या महोत्सवात कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन, महिला बचत गटांचे स्टॉल यांसह बोटिंग, पॅराग्लायडिंग, संगीत कारंजे, लेझर शो, घोडा व उंट सफारी यांसारख्या विविध आकर्षणांचा समावेश आहे.

२ ते ६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात शस्त्र प्रदर्शन, लावणी महोत्सव, पोवाडा, मर्दानी खेळ, भजन-कीर्तन, ब्रास बँड पथक तसेच हिंदी व मराठी संगीताचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा नाडेच्या विद्यार्थ्यांनी शौर्यगीत सादर केले, तर समारोपावेळी मर्दानी खेळांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा तसेच शिस्त पाळून महिला, लहान मुले आणि वृद्ध यांची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button