बजाजनगरमध्ये हुक्का कॅफेवर पोलिसांचा छापा; २१ हजारांहून अधिक किमतीचे साहित्य जप्त
नागपूरच्या बजाजनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सेलिब्रेटर (हुक्का) कॅफेवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात हुक्का साहित्य आणि सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर चौकातील सेलिब्रेटर कॅफेमध्ये हुक्का पिण्याची सुविधा दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १० मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५५ वाजता पोलिस पथकाने कॅफेवर छापा टाकला.
छाप्यात कॅफेमध्ये दोन तरुण हुक्का पित असल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान त्यांची नावे सचिन अशोक भांडे (वय २७) आणि आदित्य अनिल पेंढके (वय ३०) अशी असल्याचे समोर आले. तसेच कॅफेचा मॅनेजर अभय प्रमोद राव (वय ३४) याचीही चौकशी करण्यात आली.
पोलिस चौकशीत कॅफेचे मालक अमित भिमदेव इंगळे यांच्या आदेशाने हुक्का साहित्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे समोर आले. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पॉट, पाइप, मातीची चिलम तसेच विविध फ्लेवरचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. काही नमुने तपासणीसाठी वेगळे काढण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मॅनेजर अभय राव आणि मालक अमित इंगळे यांच्याविरुद्ध तंबाखू उत्पादन (जाहिरात प्रतिबंध व व्यापार नियमन) अधिनियम २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बजाजनगर पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त रेड्डी, सहायक पोलीस आयुक्त गुरव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगर पोलीस पथकाने केली.



