नांदेड–नागपूर महामार्गावर चालत्या टिपरला आग; मोठी दुर्घटना टळली

नांदेड–नागपूर महामार्गावर आज दुपारी चालत्या आयवा टिपर गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना पिंपळगाव शिवारातील पेट्रोल पंपासमोर घडली. नांदेडकडे जात असलेल्या आयवा टिपर गाडीमधून अचानक धूर आणि ज्वाळा बाहेर येऊ लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसेच अर्धापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, वाहनाला आग लागल्यामुळे काही काळ नांदेड–नागपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचेही पाहायला मिळाले. पोलीस आणि प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून वाहनाला आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत.



