बुलढाण्यातील संगम चौकातील दुचाकी जाळण्याच्या प्रकरणाला नवे वळण; सीसीटीव्हीत धक्कादायक सत्य उघड

बुलढाण्यातील संगम चौकात दुचाकी पेटवून दिल्याच्या कथित घटनेत मोठा खुलासा झाला आहे. अज्ञात व्यक्तींनी गाडी पेटवली असा आरोप करण्यात आला होता. मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. कारण सीसीटीव्हीमध्ये जे दिसत आहे ते धक्कादायक आहे. या घटनेचा पहिलाच सीसीटीव्ही व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागला आहे.
बुलढाणा शहरातील संगम चौक परिसरात रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ही दुचाकी देऊळघाट येथील जफ्फार खान गफ्फार खान पठाण यांची असल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घटनेनंतर जफ्फार खान पठाण यांनी गंभीर आरोप करत दोन अज्ञात व्यक्तींनी मागून येत दुचाकीवर पेट्रोल टाकून आग लावली, तसेच त्यांनाही जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला होता.
मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू करताच एक महत्त्वाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसते ते पूर्णपणे वेगळे चित्र दाखवणारे आहे. व्हिडिओमध्ये जफ्फार खान पठाण स्वतःच दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकताना आणि गाडी पेटवताना दिसत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे अज्ञात व्यक्तींनी दुचाकी पेटवली हा आरोप खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांनी स्वतःचीच दुचाकी का पेटवली, यामागे नेमके कारण काय आहे, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा पहिलाच सीसीटीव्ही व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागला असून त्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
संगम चौकातील दुचाकी पेटवण्याच्या घटनेत आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अज्ञात व्यक्तींवर करण्यात आलेला आरोप सीसीटीव्हीमुळे खोटा ठरला आहे. मात्र स्वतःचीच गाडी पेटवण्यामागे नेमके कारण काय, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.



