जागतिक महिला दिनानिमित्त अमरावतीत मोफत सर्वरोग निदान व आयुर्वेद उपचार शिबिर

अमरावतीत जागतिक महिला दिनानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. स्वराज्य फाउंडेशन गांधी आश्रम अमरावती आणि डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेदिक रुग्णालय पदव्युत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान आणि आयुर्वेद उपचार विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील अनेक गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
रविवार, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गांधी आश्रम परिसरात स्वराज्य फाउंडेशन आणि डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेदिक रुग्णालयाच्या पदव्युत्तर विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान आणि आयुर्वेद उपचार विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये विविध आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी व उपचार करण्यात आले. परिसरातील अनेक गरजू नागरिक आणि रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभाग क्रमांक १७ च्या नगरसेविका अर्चनाताई अशोकराव पांडे आणि प्रियंका भुषण पाटणे उपस्थित होत्या. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा आरोग्य शिबिरांमुळे समाजातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळतो, असे मत व्यक्त केले.
डॉ. राजेंद्र गोडे पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला साखरकर आणि त्यांच्या वैद्यकीय टीमने या शिबिरात रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन आणि उपचार सेवा दिली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्वराज्य फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या आरोग्य शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना मोफत तपासणी आणि आयुर्वेदिक उपचाराचा लाभ मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमुळे आरोग्य सेवा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.



