भातकुली तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान; ७ मार्चपासून विविध ठिकाणी शिबिरे

अमरावती (प्रतिनिधी) :
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार हे अभियान ७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ तसेच नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर एकदिवसीय शिबिरांच्या स्वरूपात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानासाठी १८ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत पूर्वतयारी करण्यात आली आहे.
या शिबिरांमधून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांना महसूल विभागाच्या विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, जमीन अभिलेख दुरुस्ती, हेल्प डेस्क सेवा तसेच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन क्रीमलेयर प्रमाणपत्रांबाबत मार्गदर्शन व तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.
याशिवाय सनद प्रणालीतील तरतुदींबाबत मार्गदर्शन, एकवेळ अधिभार भरण्याची नवी व्यवस्था, डिजिटल ७/१२ संदर्भातील कायदेशीर बाबींवर जनजागृती तसेच भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणांसाठी आवश्यक कागदपत्रांची तयारीही या शिबिरांत केली जाणार आहे. ‘एक खिडकी योजना’ अंतर्गत ई-मोजणी, अॅग्रिस्टॅक, पीएम किसान सेवा, ‘माझा ७/१२’ आणि ‘अचूक ७/१२’ मोहिमांद्वारे ७/१२ वरील पोकळ शेरे, कालबाह्य नोंदी व लेखन प्रमाद दुरुस्तीचे कामही करण्यात येणार आहे.
दरम्यान, शिबिरांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ७ मार्च – आष्टी मंडळ, १४ मार्च – निंभा मंडळ, १० एप्रिल – पुर्णानगर मंडळ, १७ एप्रिल – भातकुली नगर पंचायत, ८ मे – खोलापुर मंडळ आणि १५ मे – इतर संबंधित मंडळ येथे शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
प्रत्येक मंडळासाठी नोडल अधिकारी तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. भातकुली तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



