भांडुपमध्ये मित्रांकडून १४ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या; पुरावा लपवण्यासाठी मृतदेह विहार तलावात फेकला

मुंबई शहरातील भांडुप परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाची त्याच्याच अल्पवयीन मित्रांनी मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह तलावात फेकून बुडाल्याचा बनाव करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
मृत मुलाचे नाव सिद्धार्थ अजय लोंढे (वय १४) असे असून तो भांडुप पश्चिमेतील तुळशेटपाडा परिसरात कुटुंबासह राहत होता. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजता तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला; मात्र रात्री उशिरापर्यंत परतला नाही. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, परंतु काहीच माहिती न मिळाल्याने आईने भांडुप पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलगा हरवल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
प्राथमिक चौकशीत सिद्धार्थ मित्रांवर दादागिरी करत असल्याची माहिती पुढे आली. त्यातूनच काही मित्रांनी त्याला धडा शिकवण्याचा कट रचल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला विहार तलाव परिसरात नेण्यात आले. तेथे झालेल्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी मृतदेह तलावात फेकून बुडाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे ५ वाजता विहार तलावात एक मृतदेह आढळला. अग्निशमन दलाच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी संशयित मित्रांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान एका मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आणि आणखी दोन मित्रांचा सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी १४ ते १५ वयोगटातील तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून मारहाणीत वापरलेली लाकडी काठी जप्त केली आहे. तिन्ही मुलांना पुढील कारवाईसाठी डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांमधील वाढती आक्रमकता आणि हिंसक प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.



