कळमेश्वरमधील SBL कंपनीत भीषण स्फोट; २५ मजूर अडकल्याची भीती

कळमेश्वर (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात आज सकाळी स्फोटक निर्मिती करणाऱ्या SBL कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली. डिटोनेटर बनवण्याचे काम सुरू असतानाच हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटाच्या वेळी कंपनीत कामगारांची शिफ्ट सुरू होती आणि सुमारे २५ मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
कळमेश्वर तालुक्यातील SBL Company मध्ये आज सकाळी झालेल्या जोरदार स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. कंपनीत स्फोटके आणि डिटोनेटर तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की इमारतीच्या काही भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेच्या वेळी सुमारे २५ मजूर काम करत असल्याने काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. अनेक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. वी. पी. ईटनकर घटनास्थळी रवाना झाले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, यापूर्वीही या कंपनीत स्फोटाची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षाविषयक नियम आणि उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.
या भीषण स्फोटामुळे संपूर्ण कळमेश्वर परिसरात भीतीचे वातावरण आहे. बचावकार्य सुरू असून अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.



