अमेरिक–इराण तणावाचे पडसाद काश्मीरमध्ये; DGP-IGP मैदानात, सुरक्षेत वाढ

श्रीनगर, प्रतिनिधी : अमेरिक–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिया समुदायाचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेविरोधात शिया समुदायात तीव्र संताप व्यक्त होत असून घाटीतील विविध भागांत निषेध आंदोलने करण्यात येत आहेत. परिस्थिती लक्षात घेता पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.
रविवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस नलिन प्रभात आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस (काश्मीर) विधि कुमार बिरदी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, एसएसपी श्रीनगर तसेच विविध सुरक्षा यंत्रणांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मैदानात उतरून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
घाटीतील अनेक भागांत शांततापूर्ण निदर्शनांची नोंद झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी इराणला पाठिंबा दर्शवत अमेरिकेसह इस्रायलच्या लष्करी कारवाईचा निषेध केला. काही ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली असून वातावरण तणावपूर्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपली भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे. संवेदनशील भागांत अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
प्रशासनाने सर्व घटकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत कायदा-सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.



