१२ वर्षांचा निष्पाप जीव संशयास्पद मृत अवस्थेत; अमरावतीत खळबळ

अमरावती प्रतिनिधी :
अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत मंगळवारी सायंकाळी १२ वर्षीय किशोराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित किशोर हा मध्यप्रदेशातील रहिवासी असून गावी-गावी फिरून साड्या विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. मंगळवारी सायंकाळी तो गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
धक्कादायक बाब म्हणजे मृतकाच्या अंगावर काही ठिकाणी घाव व जखमांचे चिन्ह आढळून आले आहेत. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून हत्या असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती पोस्टमॉर्टेम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. विविध अंगांनी चौकशी सुरू असून संबंधित व्यक्तींची विचारपूस केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले असून, “हत्या की अपघात?” या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी सर्वांचे लक्ष भातकुली पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे.



