समृद्धी महामार्गावर काम… पण कामगार मात्र वेतनाविना; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

जालना प्रतिनिधी :
जालना–नांदेड दरम्यान सुरू असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पावर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संतप्त झालेल्या सुमारे ६० ते ७० कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
“काम केले… पण मोबदला नाही,” अशी भूमिका घेत कामगारांनी आपला रोष व्यक्त केला. अनेक महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वारंवार मागणी करूनही ठेकेदारांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह, राहण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत गरजा भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे तात्काळ थकीत वेतन देण्याची मागणी केली असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठेकेदारांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.



