अमरावतीमध्ये ‘मराठी शाळा वाचवा’चा एल्गार; ऑल इंडिया स्टुडेंट्स फेडरेशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अमरावती | प्रतिनिधी
“मराठी शाळा वाचवा… शिक्षण वाचवा…” या जोरदार घोषणांनी आज अमरावती शहर दणाणून गेले. ऑल इंडिया स्टुडेंट्स फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासनाच्या शाळा बंदी धोरणाविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या मोर्चात शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.
मोर्चादरम्यान
- “शाळा बंदीचा निर्णय तात्काळ रद्द करा”,
- “दत्तक शाळा योजना बंद करा”,
- “शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करा”
अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिक्षण वाचवण्याचा संदेश दिला.
लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
मराठी शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरल्याने शिक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



