वाशिम जिल्ह्यात कांदा बीज पिकावर अवकाळी पावसाचे सावट; शेतकऱ्यांची वाढली चिंता

वाशिम जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात कांदा बीजाची लागवड करण्यात आली आहे. पीक सध्या बहरात असतानाच अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. ढगाळ वातावरण आणि वाढलेला ओलावा यामुळे शेकडो हेक्टरवरील कांदा बीज उत्पादन धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
वाशिम जिल्हातील अनेक भागांमध्ये यावर्षी कांदा बीजाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. अनुकूल वातावरणामुळे पिकाने चांगली वाढ घेत फुलोरा अवस्थेत प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदा भरघोस उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
मात्र मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. फुलोरा अवस्थेत पावसाचा मारा झाला किंवा वातावरणात अधिक ओलावा राहिला तर करपा आणि बुरशीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
याचा थेट परिणाम कांदा बीजाच्या उत्पादनावर होऊन गुणवत्ता आणि उत्पन्न दोन्ही घटण्याची भीती आहे. आधीच बियाणे, खतं, औषधं आणि मजुरीचे वाढलेले खर्च यामुळे शेतकरी आर्थिक ताणात आहेत. त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. कांदा बीज उत्पादनातून चांगला दर मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत.
अवकाळी पावसाचे संकट टळावे आणि हाती आलेले पीक सुरक्षित राहावे, अशीच प्रार्थना वाशिम जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. प्रशासनानेही तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.



