Crime NewsLatest NewsNagpur gramin

खापरखेड्यात मंदिर चोरटा गजाआड! दोन मंदिरांतील दानपेट्या फोडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नागपूर (खापरखेडा) | १२ फेब्रुवारी २०२६ नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मंदिरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे खापरखेडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत महालक्ष्मी आणि मातामाय मंदिरातील चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.

एकामागून एक दोन मंदिरांत डल्ला

खापरखेडा परिसरात मंदिर चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या:

  1. ६ फेब्रुवारी २०२६: खापरखेडा रेल्वे चौकीजवळील मातामाय मंदिराचे चॅनल गेट तोडून दानपेटीतील १२ हजार रुपये लंपास करण्यात आले.
  2. ११ फेब्रुवारी २०२६: चनकापूर येथील महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी फोडून १५ हजार रुपयांची चोरी झाली.

दोन्ही घटनांमध्ये चोरीची पद्धत सारखीच असल्याने पोलिसांनी तपास चक्रावून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एकच संशयित व्यक्ती दोन्ही ठिकाणी दिसून आली.

नदीकाठच्या झुडपातून आरोपीला झडप घातली

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हरिष रूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शोध सुरू केला. दरम्यान, चिचोली कोलार नदी परिसरात एक संशयित इसम असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढला, मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

आकाश तुळशीराम चवरे (वय ३० वर्ष, रा. नहरपट्टा, खापरखेडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


मुद्देमाल जप्त

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी नदीकाठच्या झुडपात लपवलेली १५,६०४ रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. तसेच चोरीसाठी वापरलेली लोखंडी टामी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

तपास पथकाची कामगिरी

खापरखेडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत दुसऱ्या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केल्याने परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत आता नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button