Solapur ZP Result 2026: मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग; संस्कृती सातपुतेंचा विजय, उत्तम जानकरांना मोठा धक्का!

सोलापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत आज मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. माळशिरस तालुक्यातील अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या ‘दहिगाव’ जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला आहे.
मोहिते-पाटील आणि जानकरांना ‘होम ग्राऊंड’वर धक्का
माळशिरस हा मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या निवडणुकीत भाजपने या दोन्ही दिग्गज नेत्यांना मोठा धक्का दिला आहे.
- दहिगाव गट: संस्कृती सातपुते यांनी जीवन जानकर यांचा पराभव केला.
- गुरसाळे गण: येथून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
- पंचायत समिती: दहिगाव गटांतर्गत येणाऱ्या दोन्ही पंचायत समिती जागांवरही भाजपने विजय मिळवला आहे.
४ महिन्यांच्या लेकीला घेऊन केला प्रचार
या निवडणुकीत संस्कृती सातपुते यांच्या प्रचाराची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. संस्कृती यांनी आपल्या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन संपूर्ण मतदारसंघात प्रचार केला होता. भर उन्हात बाळाला घेऊन फिरणाऱ्या माऊलीला पाहून महिला मतदारांची मोठी सहानुभूती सातपुते यांच्या पारड्यात पडल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.
विरोधकांकडून टीका, राम सातपुतेंचे चोख प्रत्युत्तर
प्रचारादरम्यान संस्कृती सातपुते यांच्यावर विरोधकांनी ‘बाळाचा राजकारणासाठी वापर’ केल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राम सातपुते भावूक झाले होते. “तुमची दुश्मनी माझ्याशी आहे, माझ्या चार महिन्यांच्या बाळावर टीका का करता?” असा संतप्त सवाल त्यांनी जाहीर सभेत केला होता. अखेर मतदारांनी सातपुते यांच्या संघर्षाला साथ देत संस्कृती यांना कौल दिला आहे.
आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
या लढतीमध्ये एका बाजूला माजी आमदार राम सातपुते तर दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मोहिते-पाटील आणि जानकर एकत्र असतानाही भाजपने येथे मिळवलेला विजय हा आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.



