परभणीत घराणेशाहीला जनतेचा ‘धप्पा’! भाजप नेते सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील ५ पैकी ४ सदस्य पराभूत; वाचा सविस्तर निकाल

परभणी: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांमध्ये आज अनेक प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती परभणी जिल्ह्याची. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील पाच सदस्य या निवडणुकीत नशीब आजमावत होते. मात्र, परभणीच्या जनतेने घराणेशाहीला स्पष्ट नकार देत त्यांच्या कुटुंबातील तब्बल चार सदस्यांना पराभवाचा धुळवड दाखवली आहे.
५ पैकी ४ सदस्य ‘क्लीन बोल्ड’
वरपूडकर कुटुंबासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील सदस्य असूनही त्यांनी वेगवेगळ्या चिन्हावर नशीब आजमावले होते, तरीही जनतेने त्यांना नाकारले:
१. सोनल वरपूडकर-देशमुख (कन्या): झरी जिल्हा परिषद गटातून ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवली, मात्र भाजपच्या दिलीप देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. २. समशेर वरपूडकर (चिरंजीव): शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून रिंगणात होते, तेथे ‘मशाल’ चिन्हावरील पांडुरंग खिल्लारे यांनी त्यांचा पराभव केला. ३. प्रेरणा वरपूडकर (सून): दैठणा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली, मात्र काँग्रेसच्या ज्योत्स्ना घाडगे यांनी त्यांचा पराभव केला. ४. ऐश्वर्य वरपूडकर (पुतण्या): लोहगाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर उभे होते, पण त्यांचाही पराभव झाला.
पुतण्याने वाचवली कुटुंबाची अब्रू
सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील एकमेव विजयी उमेदवार म्हणजे त्यांचे पुतणे अजित वरपूडकर. त्यांनी लोहगाव जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या ‘पंजा’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांनी स्वतःच्याच भावाचा (ऐश्वर्य वरपूडकर) पराभव करत विजय मिळवला.
घराणेशाहीला घरचा रस्ता
परभणीच्या राजकारणात अनेक दशकांपासून वरपूडकर कुटुंबाचा दबदबा आहे. या निवडणुकीत त्यांनी मुलगा, मुलगी, सून आणि पुतणे अशा सर्वांनाच रिंगणात उतरवून आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी नेत्यांच्या घरातील मोठ्या नावांपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांना आणि स्थानिक चेहऱ्यांना पसंती देऊन घराणेशाहीला मोठा संदेश दिला आहे.
परभणी जिल्हा परिषदेत भाजपची मुसंडी
वैयक्तिकरित्या वरपूडकर कुटुंबाला धक्का बसला असला तरी, परभणी जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २१ जागा जिंकून मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.



