देशी कट्टे आणि जिवंत काडतूस सह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन देशी कट्टे आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घातक शस्त्र विरोधी मोहीम राबवली. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील शिवाजीनगर परिसरात दोन विधीसंघर्षग्रस्त बालक कंबरेला अग्निशस्त्र लावून फिरत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ हालचाल करत शिवाजीनगर नवी वस्ती येथून बडनेरा रेल्वे लाईनकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सापळा रचला. मोठ्या शिताफीने दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून दोन देशी कट्टे (पिस्टल) आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ८१ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन बडनेरा येथे आर्म अॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
अमरावती शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कठोर कारवाई केली जात आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून घातक शस्त्र जप्त होणे ही गंभीर बाब असून, शहरातील सुरक्षिततेसाठी ही कारवाई महत्त्वाची ठरत आहे.



