विद्यापीठ भौतिकशास्त्र विभागाची कु. साक्षी चोपकरला प्रथम महिला कुलगुरू डॉ. कमलसिंग सुवर्ण पदक

अमरावती (दि. 06.02.2026) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थीनी कु. साक्षी गजानन चोपकर हिने विद्यापीठाच्या उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पदव्युत्तर पदार्थ विज्ञान विभागातून विज्ञान पारंगत (पदार्थ विज्ञान) प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विद्यापीठाच्या 42 व्या दीक्षांत समारंभात कु. साक्षी हिला डॉ. कमलसिंग प्रथम महिला कुलगुरू सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे. या सुवर्ण पदकासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी प्रथम कुलगुरू डॉ. कमलसिंग यांनी दाननिधी दिलेला आहे.
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी नियमितपणे उच्च स्तरावर काम करीत असतात. त्यामुळे विभागात संशोधनाची गुणवत्ता व शिस्त कायम राहते. विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असल्यामुळे ते नवे संशोधन करत, जागतिक पातळीवर कार्य करण्यास सक्षम होतात. भौतिकशास्त्र विभागात विद्याथ्र्यांकरिता अत्याधुनिक प्रयोगशाळा व तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध आहेत. विभागातील विज्ञान स्नातकोत्तर भौतिकशास्त्र हा अभ्यासक्रम करून विद्यार्थी वैज्ञानिक, रेडिओलॉजिस्ट, हवामान शास्त्रज्ञ, फॉरेन्सिक लॅबमध्ये विश्लेषक, आयएएस, वायरलेस स्ट्रीममध्ये पोलीस अधीक्षक, प्राध्यापक, व्याख्याते, शिक्षक, दूरसंचार अधिकारी म्हणून नियुक्त झालेले आहेत. कु. साक्षी हिच्या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे तसेच विभागातील प्राध्यापक, संशोधक, शिक्षरवृंद, विद्याथ्र्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



