अ.भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अव्वल

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा, पुरुष स्पर्धेचा थाटात समारोप
अमरावती (दि. 05.02.2026) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली आयोजित ‘अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळविला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला सुवर्ण पदक, माधव विद्यापीठ, पिंडवारा, राजस्थानने रजत पदक, कालिकत विद्यापीठाने कांस्य पदक व महाराजा सुरजामल ब्रिाज विद्यापीठ, भरतपूरने ब्राांझ पदक पटकाविले. यावेळी ट्रॉफी व पदके देवून चमूंना सन्मानित करण्यात आले. पुरुष स्पर्धेचा समारोपीय समारंभ उत्साहात पार पडला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षीय भाषण करताना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे कौतूक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबू इंगोले, उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर, उपाध्यक्ष श्री केशवराव मेतकर, सचिव डॉ. व्ही.जी. ठाकरे, महाराष्ट्र सॉफ्ट बॉल असोसिएशनचे सहसचिव सुरजसिंह येवतीकर, प्राचार्य डॉ. जी.व्ही. कोरपे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत, डॉ. रुपाली इंगोले आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला मोठ¬ा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाची दीर्घ परंपरा लाभली आहे. संपूर्ण भारतात अमरावती विद्यापीठाची ओळख एक जबाबदार आणि शिस्तबध्द यजमान म्हणून आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते. सर्व सामने पारदर्शकपणे पार पडल्याबद्दल त्यांनी सर्व आयोजक आणि पंच समितीचे विशेष आभार मानले. येणा-या जागतिक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना या स्पर्धेतील पहिल्या चार क्रमांकावर राहिलेल्या संघांमधील गुणवान खेळाडूंचा प्राधान्याने विचार करावा. भविष्यात जागतिक स्तरावरील निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी अमरावती विद्यापीठ सदैव सज्ज असेल, असेही कुलगुरू म्हणाले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. दिलीपबाबू इंगोले यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी संस्था असून विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये 340 हून अधिक महाविद्यालयांच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त करुन कालिकत विद्यापीठाचा उल्लेख करीत आपण पहिली आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा कालिकत येथे खेळल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केवळ जिंकणे महत्त्वाचे नसून आपला सर्वोत्तम खेळ प्रदर्शित करुन निवड समितीचे लक्ष वेधून घेणारा असावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला. खेळात जयपराजय होतच असतो, परंतु आपला खेळ सर्वांच्या स्मरणात राहील व देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल असा असला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी भरतपूर संघाचे कोच अभिषेक व कालिकत विद्यापीठाचे मोहम्मद अली यांनी मनोगत व्यक्त करतांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने राहण्याची व प्रवासाची उत्तम सोय केल्याचे सांगितले. सर्व अम्पायरने सर्व सामन्यांचे अचूक परिक्षण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व जजेसचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट टिचर पुरस्कार श्री जगदीश (माधव विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ कॅचर रोहित सहारे (अमरावती विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ बेसमॅन सोनू गुजर (भरतपूर), श्री लेखराज व श्री राजपुत (माधव विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ शॉटअप जितेंद्र (कालिकत विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ राईट फिल्डर श्री अभिषेक (कालिकत विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ सेंटर फिल्डर रोहन पोटे (अमरावती विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ लेफ्ट फिल्डर श्री जयपाल (भरतपूर विद्यापीठ), सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर कॅप्टन ऋतिक पुडवे (अमरावती विद्यापीठ) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
विद्यापीठ गीताने समारोप समारंभाची सुरूवात झाली. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. रुपाली इंगोले यांनी स्पर्धेचा अहवाल मांडला. संचालन डॉ. दिनेश खेडकर व डॉ. रेखा मग्गीरवार यांनी, तर आभार क्रीडा संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी मानले. स्पर्धेच्या आय़ोजनाकरिता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षक डॉ. कविता वाटाणे, सर्व शारीरिक शिक्षक तसेच विद्यापीठ शारीरिक शिक्षक विभागातील संतोष वानखडे, अरुण लोहे, अब्दुल तौसिफ आदिंनी परिश्रम घेतले. समारोप कार्यक्रमाला स्पर्धेचे मुख्य परिक्षक श्री मुकुंद देशपांडे, महाविद्यालयातील शिक्षक व खेळाडू मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



