Crime NewsLatest News

धावडा परिसरात अवैध मुरूम व वाळू उपशाचा धुमाकूळ; पारध पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह!

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात सध्या अवैध गौण खनिजाच्या तस्करीने उच्चांक गाठला आहे. दिवस-रात्र ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या साहाय्याने अवैध मुरूम व वाळूची वाहतूक सुरू असून, याकडे पारध पोलीस प्रशासन हेतुपुरस्सर डोळेझाक करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पोलीस कारवाईत ‘दुजाभाव’? नागरिकांचा संताप

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पारध पोलिसांची कारवाई केवळ ‘निवडक’ लोकांवरच होत आहे. काही दिवसांपूर्वी घरकामासाठी वाळू नेणाऱ्या एका सामान्य नागरिकाचा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडून त्यावर कडक कारवाई केली. मात्र, त्याच वेळी मोठे व्यावसायिक आणि राजकीय वरदहस्त असलेले ट्रॅक्टर राजरोसपणे त्याच रस्त्यावरून धावत आहेत.

यामुळे, “हप्ता देणाऱ्यांना अभय आणि गरिबांवर कारवाई” असे समीकरण पारध पोलिसांच्या बाबतीत सुरू असल्याची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. “कायदा सर्वांसाठी समान आहे की तो पैशांच्या जोरावर वाकवला जातो?” असा संतप्त सवाल धावडा परिसरातील नागरिक विचारत आहेत.

‘जाडीचा देव’ यात्रेचे कारण अन् तक्रारींकडे पाठ

या बेकायदेशीर कृत्याबद्दल जेव्हा जागरूक नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी फोन उचलणे टाळले. त्यानंतर कर्मचाऱ्यांशी संपर्क झाला असता, “आम्ही जाडीच्या देव यात्रेच्या बंदोबस्तात व्यस्त आहोत,” असे सांगून तक्रारीची दखल घेण्यास नकार देण्यात आला. बंदोबस्ताचे कारण सांगून अवैध धंद्यांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.

प्रशासकीय महसूल आणि पर्यावरणाचे नुकसान

अवैध उत्खननामुळे परिसरातील नदीपात्रांचे आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आंदोलनाचा इशारा

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. जर तातडीने अवैध वाहतूक थांबवून दोषींवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समिती व ग्रामस्थांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button