AmravatiLatest News

शस्त्रांसह धुडगूस घालणाऱ्यांची गाडगे नगर पोलिसांनी काढली वरात

अमरावती: शहरातील गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लक्ष्मी नगर परिसरात शस्त्रांसह धुडगूस घालून दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. वाहनांची तोडफोड आणि घरावर हल्ला करणाऱ्या ६ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, सोमवारी भरदिवसा त्यांची घटनास्थळी ‘ओळखपरेड’ (धिंड) काढण्यात आली. पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

नेमकी घटना काय?

१ जानेवारीच्या मध्यरात्री लक्ष्मी नगर परिसरात आरोपींनी शस्त्रांसह धुडगूस घातला होता. एका घरावर हल्ला करण्यासोबतच परिसरातील उभ्या असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. फिर्यादी अनिकेत दीपक देसाई यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यात आरोपींची कृत्ये कैद झाली होती.

सीसीटीव्ही ठरले गेमचेंजर; ६ जण अटकेत

तक्रार दाखल होताच गाडगे नगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ६ आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. यश राजू भाई देसाई (वय २४, रा. लक्ष्मी नगर) २. करण राजेश काळे (वय २१, रा. खोलापुरी गेट) ३. कुणाल अनिल वाघमारे (वय २५, रा. लक्ष्मी नगर) ४. अंश अनिलराव वाघमारे (वय २१, रा. लक्ष्मी नगर) ५. कृष्णा प्रमोद सूर्यवंशी (वय १९, रा. लक्ष्मी नगर) ६. पंकज गुणवंत टेकाम (वय २७, रा. लक्ष्मी नगर)

भरचौकात काढली वरात!

गुन्हेगारांमधील कायद्याची भीती जिवंत ठेवण्यासाठी पोलिसांनी सोमवारी दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात सर्व आरोपींना लक्ष्मी नगर परिसरात नेले. ज्या ठिकाणी त्यांनी धुडगूस घातला होता, त्याच ठिकाणी त्यांची ओळखपरेड घेण्यात आली. आपल्या भागातील गुंडांची पोलिसांनी काढलेली ही ‘वरात’ पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून गाडगे नगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

“शहरात दहशत माजवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे आरोपींना तातडीने अटक करण्यात आली आहे,” असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button