Latest NewsNagpur gramin

रामटेक पोलिसांची मोठी कारवाई: कारमधून चाललेली गोवंशाची अवैध वाहतूक रोखली, ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

रामटेक : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात गोवंशाच्या अवैध वाहतुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत एका कारमधून पाच जनावरांची सुटका केली, मात्र या क्रूरतेत एका कालवडीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या कारवाईत ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय?

दिनांक ३१ जानेवारी रोजी पहाटे २ ते २.३० वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, तुमसरकडून रामटेकच्या दिशेने एका पांढऱ्या मारुती सुझुकी कारमधून जनावरांची तस्करी होत आहे. या माहितीच्या आधारे रामटेक पोलिसांनी खिंडशी पुलाजवळ नाकाबंदी करून सापळा रचला.

पाठलाग आणि कारवाई

संशयित कार (क्र. MH31 CP6511) येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केला असता, खिंडशी पुलासमोर इलेक्ट्रिक डी.पी.जवळ कार सोडून चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

जनावरांची अत्यंत क्रूर अवस्था

पोलिसांनी कारची तपासणी केली असता, मागील सीट काढून त्या जागी २ गाई आणि ३ कालवडी पाय बांधून अत्यंत निर्दयीपणे कोंबलेल्या आढळल्या. या जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय नव्हती. दुर्दैवाने, यातील एक कालवड मृतावस्थेत आढळली.

मुद्देमाल आणि गुन्हा दाखल

पोलिसांनी ₹५०,००० किमतीची जनावरे आणि ₹३,००,००० किमतीची कार, असा एकूण ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेख राशीद शेख जावेद (वय २५, रा. कामठी) याला ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुद्ध ‘प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम’ आणि ‘महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमा’सह बी.एन.एस. च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास रामटेक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

रिपोर्ट: अजय मेहरकुळे, रामटेक

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button