मोठी बातमी: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अजितदादांच्या निधनानंतर पवारांच्या गोटातून रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोकभवनच्या दरबार हॉलमध्ये सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
पवार कुटुंबाची अनुपस्थिती आणि राजकीय खळबळ
सुनेत्रा पवार यांचा हा शपथविधी सोहळा पार पडत असताना संपूर्ण पवार कुटुंब तेथे उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या ऐतिहासिक क्षणी सुनेत्रा पवार यांच्यासोबत केवळ त्यांचे चिरंजीव जय पवार उपस्थित होते.
या निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत उघड नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. या शपथविधीपूर्वी गोविंद बागेत पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठकही पार पडली होती.
‘अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही’ – रोहित पवारांची भावूक पोस्ट
सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की: > “राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..!”
कठोर निर्णय की राजकीय अपरिहार्यता?
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चार दिवसांत सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, व अल्पसंख्याक विकास ही खाती सोपवण्यात आली आहेत.



