‘काया वाचा मने’ कादंबरी अंतर्मनातील संघर्षांचे आणि सामाजिक वास्तवाचे प्रामाणिक भाष्य – प्रा.डॉ. माधव पुटवाड

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने विद्यापीठात चर्चासत्र संपन्न
अमरावती – (दि. 31/01/2026) – साहित्य हे केवळ कथानक सांगण्याचे माध्यम नसून, ते माणसाच्या ‘काया, वाचा आणि मन’ या त्रिसूत्रीचे सखोल आत्मपरीक्षण असते. ‘काया वाचा मने’ ही कादंबरी माणसाच्या देहबद्ध अस्तित्वापासून मानसिक आंदोलनापर्यंतचा प्रवास उलगडते आणि म्हणूनच ती केवळ वाचली जात नाही, तर विचार करायला भाग पाडते, असे मार्मिक विवेचन प्रा.डॉ. माधव पुटवाड यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – २०२६ निमित्त ‘काया वाचा मने’ या कादंबरीवर आयोजित चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना प्रा.डॉ. पुटवाड यांनी कादंबरीच्या आशयविश्वाचा सखोल वेध घेतला. त्यांनी सांगितले की, ‘काया वाचा मने’ ही कादंबरी व्यक्ती आणि समाज यांच्यातील संघर्ष, नैतिक द्वंद्व, मूल्यांची घसरण आणि माणसाच्या अंतर्मनातील अस्वस्थता यांचे प्रभावी चित्रण करते. साहित्य असो वा कोणताही विचारप्रवाह तो कधीच अंतिम नसतो. अंतिम सत्याचा दावा करणारा विचार हा मुळातच स्थैर्य गमावलेला असतो आणि म्हणूनच तो प्रश्नांकित होण्याच्या भीतीने दैववादी चौकटीत अडकतो. अशा दैववादी दृष्टिकोनाला नाकारण्याचे धाडस करणे हे सोपे नसते; कारण ते माणसाच्या सुरक्षिततेच्या भावनेला धक्का देणारे असते. मात्र ‘काया वाचा मने’ या कादंबरीत लेखकाने हे धाडस केले आणि म्हणूनच ही कादंबरी वैचारिकदृष्ट्या महत्त्वाची ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चासत्राचे प्रमुख अतिथी आणि कादंबरीकार श्री. सुनील यावलीकर यांनी कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेविषयी सविस्तर भूमिका मांडली. समाजात दिसणाऱ्या विसंगती, माणसाच्या मनातील ताणतणाव आणि व्यक्तीच्या नैतिक संघर्षांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न या कादंबरीत केल्याचे त्यांनी सांगितले. “साहित्य हे प्रश्न विचारण्यासाठी असते, उत्तरे देण्यासाठी नव्हे,” असे सांगत त्यांनी वाचकाला अस्वस्थ करणारे साहित्यच दीर्घकाळ टिकते, ही भूमिका अधोरेखित केली.
प्रा. डॉ. मोना चिमोटे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर अशा चर्चासत्रांचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक महत्त्व विशद केले. मराठी साहित्याचा अभ्यास हा केवळ अभ्यासक्रमाचा भाग न राहता समाजाशी जोडलेला असावा, असे त्यांनी नमूद केले. संशोधक आणि विद्यार्थ्यांनी साहित्याकडे केवळ भावनिक नव्हे तर चिकित्सक दृष्टीने पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्चासत्रात सहभागी वक्त्यांनी कादंबरीचे विविध अंगांनी विश्लेषण केले. प्रसिद्ध समीक्षक श्री. दा. गो. काळे यांनी ‘काया वाचा मने’ या कादंबरीचे मराठी कादंबरी परंपरेतील स्थान अधोरेखित केले. ही कादंबरी म्हणजे समाजाचा कळवळा म्हणून प्रेरित झालेल्या नायकाची गोष्ट आहे. तो संघटनेत त्याच आत्मीयतेने आपलं काम करतो. ही सामाजिक संरचना त्याला मुळापासून बदलायची असते; परंतु त्यात आलेल्या अनुभवांनी तो ढासळतो. तो संवेदनशील आहे. या गोष्टी तो सजगतेने पाहतो. एका व्यवस्थेचा सामना करताना आपल्यातच एका वेगळ्या व्यवस्थेचा जन्म नकळत होतो. त्यातला शिक्षक हा सजग आहे. तो हा संघर्ष सूक्ष्मपणे टिपत जातो. त्यासाठी आपल्या ज्ञानाची व ज्ञानदानाची सगळी इंद्रियं जागृत ठेवत ‘काया वाचा मनाने’ ही सगळी व्यवस्था अनुभवत असतो. त्या अनुभवाचा दस्तऐवज म्हणजे ही कादंबरी आहे.
डॉ. प्रणव कोलते यांनी कादंबरीच्या भाषाशैली, निवेदनतंत्र आणि आशय-रचना यांची सखोल अभ्यासपूर्ण मांडणी केली. कादंबरीतील भाषा ही सहज, संवादप्रधान असतानाच अंतर्मुख करणारी असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तववादी कथन आणि मानसिक विश्लेषण यांचा साधलेला समतोल ही या कादंबरीची महत्त्वाची ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. भगवान फाळके यांनी ‘काया वाचा मने’ या कादंबरीची केवळ प्रशंसात्मक नव्हे, तर अत्यंत परखड आणि चिकित्सक समीक्षा केली. दिनकर या नायकाने चळवळ का सोडली याचे स्पष्टीकरण देणारी ‘काया वाचा मने ‘ ही कादंबरी आहे. ही कादंबरी सामान्य वाचकाना सामाजिक चळवळीविषयी निराशा वा नकारात्मक दृष्टिकोन देते . सामाजिक कार्यकर्त्यांना व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील संतुलन साधण्यासाठी मार्गदर्शक ठरते तर आत्मकेंद्री व समाजविन्मुख जीवन जगणाऱ्यांना सामाजिक चळवळींवर टिका करण्यासाठी कोलित देते. कादंबरीतील नायकाचे बरेचसे चिंतन अत्यंत सामान्य स्वरूपाचे आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या चर्चासत्राचे प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रा. अभिजित इंगळे यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रा. सारिका वनवे यांनी केले. या चर्चासत्रासाठी शिक्षण व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पदव्युत्तर मराठी विभागातील उमाशंकर ठाकूर, अंशदायी शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित हे चर्चासत्र मराठी साहित्याची समज, अभ्यास आणि सामाजिक भान यांना नवी दिशा देणारे ठरले, अशी भावना उपस्थित साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.



