Latest NewsVidarbh Samachar

अमृतकाळातील प्रजासत्ताकात प्रगत भारत, उज्ज्वल भविष्याचे स्वप्न साकार करूया : कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा

वर्धा, 27 जानेवारी 2026 : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापनदिनानिमित्त संबोधित करताना कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा म्हणाल्या की अमृतकाळातील प्रजासत्ताकात आपण परिवर्तनाच्या मार्गावर नवा भारत घडविण्याकडे वाटचाल करत आहोत. आपल्या डोळ्यांसमोर प्रगत भारत आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आहे, जे साकार करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे.

विश्‍वविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. वाचस्पती भवनाच्या प्रांगणात कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. यावेळी विश्‍वविद्यालय परिवाराला संबोधित करताना त्‍या म्‍हणाल्‍या की प्रजासत्ताक दिन हा आपल्या स्वाभिमान व सन्मानाचा दिवस आहे. हा राष्ट्रीय सण पराक्रम, देशभक्ती आणि विकासयात्रेचा उत्सव आहे. स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांचे स्मरण करत त्‍या म्‍हणाल्‍या की हा दिवस भारताच्या निर्मात्यांना आठवण्याचा आहे. आजच्या दिवशी आपल्याला समृद्ध लोकशाही मिळाली, ज्याने न्याय आणि समतामूलक रचनेत सन्मानपूर्वक जीवन जगण्याची हमी दिली आहे. आपल्याला अधिकार व कर्तव्यांची आचारसंहिता प्राप्त झाली.

स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान दिलेल्या समाजशास्त्रज्ञ, साधू, पीर, कलाकार व साहित्यिक यांचा उल्लेख करत त्‍या म्‍हणाल्‍या की त्यांच्या संघर्ष व चिंतनामुळेच आपल्याला सामाजिक न्यायाचा मार्ग आणि मानवी मूल्ये मिळाली आहेत, विकसित भारत–2047 संदर्भात त्‍या म्‍हणाल्‍या की देशाच्या सध्याच्या नेतृत्वाने दाखवलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. देशात मानवजातीच्या हितासाठी सामाजिक-आर्थिक उपक्रम राबवले जात आहेत आणि अनेक योजना देशाला प्रगतीच्या मार्गावर नेत आहेत.

कुलगुरू म्‍हणाल्‍या की यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम ‘वंदे मातरम्’ आहे. आपण ‘वंदे मातरम्’ गीताच्या 150 व्या जयंतीचे स्मरण करत आहोत. या मंत्राने स्वातंत्र्यलढ्यात असंख्य देशभक्त निर्माण केले. हे गीत सन 1875 मध्ये बंगालमध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले, जे स्वातंत्र्य चळवळीचा शंखनाद ठरले. तो प्रेरणादायी राष्ट्रवादाचा काळ होता, ज्याने राष्ट्रचेतनेचे बीज रोवले.

देशाच्या युवा शक्तीबद्दल बोलताना कुलगुरू म्‍हणाल्‍या की आज देश तरुणाईने ओतप्रोत आहे. आपले तरुण जागतिक स्तरावर ओळख निर्माण करत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्र फक्त उपभोगाची बाजारपेठ नसून नवोन्मेषाचा निर्माता बनत आहे, ज्यात युवकांची मोठी भूमिका आहे. दावोस परिषदेतही भारताची चर्चा झाली. भारताकडे जागतिक व्यवस्था पाहण्यासाठी संकेत दिले गेले. भारत सहकार्य व संतुलनाची भाषा बोलणारी शक्ती म्हणून ग्लोबल साउथचा आवाज बनण्यास सज्ज आहे. तरुणांमध्ये अपार ऊर्जा, शक्ती आणि कौशल्य आहे. त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला पाहिजे, त्‍यांनी आपल्या अंतर्गत क्षमतेचा वापर देशहितासाठी करावा, असे त्यांनी आवाहन केले.

ध्वजारोहणावेळी व्यासपीठावर कुलसचिव कादर नवाज खान, परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेंद्र गादेवार, वित्ताधिकारी पी. सरदार सिंह, अधिष्ठाता प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल, प्रो. अवधेश कुमार, प्रो. प्रीती सागर, प्रो. फरहद मलिक, प्रो. गोपालकृष्ण ठाकूर, प्रो. जनार्दन कुमार तिवारी आणि निवासी लेखक डॉ. क्षमा कौल उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीला कुलगुरूंनी महात्मा गांधी व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून नमन केले. ध्वजारोहणावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बँडने राष्ट्रगीत सादर केले आणि राष्ट्रीय कॅडेट कोरच्या विद्यार्थ्यांनी परेड केली. सीनियर अंडर ऑफिसर कमांडर हर्ष गुप्ता यांनी एनसीसीचे प्रतिनिधित्व केले. या प्रसंगी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button