Accident NewsLatest NewsRaigad

राजगडावर चढाईदरम्यान २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हृदयविकाराचा संशय

राज्यात सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. २३ जानेवारीपासून किल्ले, डोंगरदऱ्या आणि निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. अशातच किल्ले राजगड येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

बेळगाव तालुक्यातील २१ वर्षीय नागराज गुरू कोरी हा युवक मित्रांसह राजगडावर पर्यटनासाठी आला होता. रविवारी सकाळी गुंजवणे मार्गे किल्ला चढत असताना गुंजवणे दरवाज्याजवळ त्याला अचानक धाप लागली व छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर तो पुन्हा चढाई करू लागला; मात्र पुन्हा छातीत दुखू लागल्याने त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध पडला.

घटनेची माहिती मिळताच सोबतच्या मित्रांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधला. वेल्हे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सोमेश राऊत यांनी पुरातत्व विभागाचे कर्मचारी विशाल पिलावरे यांच्याशी संपर्क साधून मदतकार्य सुरू केले. प्रकाश ढेबे याच्यासह गडावरील पर्यटक युवराज पाटील, अनिकेत पासलकर, समीर कामठे आणि गणेश दीक्षित यांच्या सहाय्याने नागराजला स्ट्रेचरवरून गडाच्या पायथ्याशी आणण्यात आले.

त्यानंतर नागराजला तात्काळ वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी तपासणीअंती रुग्णालयात येण्यापूर्वीच नागराजचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या घटनेमुळे राजगडावर आलेल्या पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, वेल्हे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button