वाघोड ग्रामपंचायतीला उद्घाटनाचा मुहूर्त मिळेना! नवीन वास्तू धूळखात, देखभालीच्या नावाने मात्र ‘लक्ष्मीदर्शन’

रावेर (प्रतिनिधी): शासकीय निधीचा खर्च झाला, इमारत उभी राहिली, पण उद्घाटनाची फीत कापायला मुहूर्तच मिळेना! रावेर तालुक्यातील वाघोड येथे वित्त आयोगाच्या निधीतून बांधून तयार असलेल्या नवीन ग्रामपंचायत कार्यालयाची सध्या दुरवस्था होत असून, या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका प्रकार काय?
- रंगकामाचा फेरा: नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने केलेले रंगकाम ग्रामपंचायत प्रशासनाला पसंत पडले नाही. परिणामी, पुन्हा शासकीय तिजोरीतून ४० हजार रुपये खर्च करून नव्याने रंगरंगोटी करण्यात आली. तरीही कार्यालयाचा दरवाजा ग्रामस्थांसाठी उघडला गेलेला नाही.
- इमारत उद्घाटनापूर्वीच खिळखिळी: आश्चर्याची बाब म्हणजे, अद्याप लोकार्पण झाले नसतानाच मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवरील फरशा फुटल्या होत्या. प्रशासनाने त्यावर डागडुजी करून वेळ मारून नेली आहे.
- धुळीचे साम्राज्य: कार्यालयाच्या आत आणि बाहेर धुळीचे लोट साचले आहेत. इमारतीवर लावलेले माहिती फलक कागदाने झाकलेले होते, पण ते कागदही आता फाटून लोबंकळत आहेत, ज्यामुळे इमारतीला अवकळा आली आहे.
पदाधिकाऱ्यांची उदासीनता की राजकीय पेच?
इमारत सज्ज असताना आणि सर्व सोयी उपलब्ध असताना केवळ उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. यामध्ये ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची कमालीची उदासीनता दिसून येत असून, “नेमकं कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचं?” या राजकीय पेचात ही वास्तू अडकली आहे का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
“जनतेच्या पैशातून उभी राहिलेली ही वास्तू धूळखात पडली आहे. तातडीने उद्घाटन करून गावाचा कारभार येथून सुरू करावा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल,” अशी भावना वाघोड येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



