मुरूम तस्करीच्या वादातून अपघाताचा कट रचून निलेशची हत्या

चांदूर बाजार (अमरावती): मुरूम तस्करीच्या वादातून अपघाताचा बनाव रचून एका व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना चांदूर बाजार तालुक्यात घडली आहे. ब्राम्हणवाडा थडी येथील नामांकित गौणखनिज व्यावसायिक निलेश बदुकले यांची हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अजय भुजंगराव लंगोटे याला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट असून पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मॉर्निंग वॉक दरम्यान रचला मृत्यूचा सापळा
प्राप्त माहितीनुसार, निलेश बदुकले हे सोमवारी सकाळी आपल्या पत्नीसह वलगाव-अमरावती मार्गावर मॉर्निंग वॉक करत होते. यावेळी मागून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की निलेश बदुकले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी या अपघातात जखमी झाल्या आहेत. सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी, हा जुन्या वादातून रचलेला हत्येचा कट असल्याचे समोर आले आहे.
मुरूम तस्करीचा वाद ठरला कारण
मृतकाचे वडील सुरेश बदुकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निलेश आणि आरोपी अजय लंगोटे यांच्यात गेल्या काही काळापासून मुरूम तस्करीच्या कारणावरून वाद सुरू होते. याच रागातून अजयने निलेश यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
ग्रामस्थांचा संताप आणि पोलीस ठाण्यावर धडक
घटनेची माहिती मिळताच ब्राम्हणवाडा थडी येथील शेकडो ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यावर धाव घेतली. जोपर्यंत आरोपीवर हत्येचा (कलम ३०२) गुन्हा दाखल होत नाही आणि त्याला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतली. यामुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांची कारवाई
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवले. सुरेश बदुकले यांच्या तक्रारीवरून आरोपी अजय लंगोटे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.



