‘जागतिक पारायण दिन’ उत्साहात संपन्न; उषा कॉलनीतील गजानन महाराज सेवा मंडळाचा उपक्रम

अमरावती: संत गजानन महाराजांवरील अपार श्रद्धेला समर्पित ‘जागतिक पारायण दिन’ रविवारी, ११ जानेवारी २०२६ रोजी उषा कॉलनी येथील श्री संत गजानन महाराज सेवा मंडळाच्या वतीने अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सामूहिक पारायण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भक्तिरसात न्हाली उषा कॉलनी
पवित्र दिनाचे औचित्य साधून मंडळाने श्री संत गजानन विजय ग्रंथाच्या सामूहिक वाचनाचे आयोजन केले होते. संपूर्ण परिसर ‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. वाचक सौ. अंजलीताई देशपांडे यांनी दासगणू महाराज लिखित ‘विजय ग्रंथा’चे अत्यंत भावपूर्ण आणि रसाळ वाचन केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थित भाविकांमध्ये अध्यात्मिक चेतना जागृत होऊन वातावरण भक्तीमय झाले होते.
भजन संध्येने वाढविली रंगत
कार्यक्रमाचे सुबक आणि शिस्तबद्ध संचालन मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री. अशोकराव कणसे (गुरुजी) यांनी केले. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे ‘केसरी नंदन’ भजन मंडळाने सादर केलेली भजन संध्या. त्यांच्या सुमधुर भजनांनी कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवली आणि भाविकांना मंत्रमुग्ध केले.
मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला मंडळाचे अध्यक्ष श्री. अजय देशमुख, उपाध्यक्ष श्री. प्रमोदराव नावाडे, सचिव प्रा. डॉ. चंद्रशेखर सावरकर, सहसचिव श्री. राजेंद्रजी नांदुरकर, कोषाध्यक्ष श्री. गजाननराव कोकाटे आणि सहकोषाध्यक्ष श्री. प्रवीण कावलकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यकारिणी सदस्य श्री. सूरज चव्हाण, डॉ. कल्याण मालधुरे, प्रा. डॉ. प्रशांत शिंगवेकर, श्री. दिलीप सावरकर यांच्यासह उषा कॉलनी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात सामाजिक ऐक्य, सद्भावना आणि आध्यात्मिक जाणीव अधिक दृढ होते, अशी भावना उपस्थित भाविकांनी यावेळी व्यक्त केली.



