नागपूरमध्ये मध्यरात्री तरुणावर जीवघेणा हल्ला; आठ आरोपी ताब्यात

नागपूर
नागपूर शहरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास एका तरुणावर तब्बल आठ जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या हल्ल्यात तरुणाचे प्राण वाचले असून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
ही गंभीर घटना नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित तरुण हा रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास रस्त्यावरील भुकेल्या प्राण्यांना अन्न घालून घरी परतत होता. याच दरम्यान काही अज्ञात इसमांनी त्याचा पाठलाग सुरू केला.
तरुण घराजवळ पोहोचताच सुमारे आठ जणांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. लाथा-बुक्क्यांनी तसेच मारहाण करत तरुणाला गंभीर जखमी करण्यात आले. तरुणाच्या आरडाओरडीनंतर त्याचे आई-वडील तात्काळ बाहेर आले आणि धाडस दाखवत मुलाला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले.
या घटनेप्रकरणी पीडित तरुणाने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला आहे.
या घटनेबाबत माहिती देताना लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे.



