Latest NewsSocial News

सावित्रीबाई फुले शिक्षकांचे आदर्श – डॉ. श्रीकांत पाटील

अमरावती : गेल्या दीडशे वर्षात भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असून अगदी अंतराळ क्षेत्रातही भरीव योगदान देतांना महिलांची कर्तबगारी सर्वश्रूत आहे. शिक्षण क्षेत्रात सुध्दा स्त्रियांनी यशस्वी कार्याची वाटचाल केली असून समाजाला संस्कारित करण्याची भूमिका पार पाडताना दिसत आहेेत. सावित्रीबाईंची हिच ज्ञानज्योत तेजस्वी ठेवण्यासाठी शिक्षक नेहमीच सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श घेतात, त्यामुळे शिक्षकांचे आदर्श सावित्रीबाई फुले असल्याचे प्रतिपादन आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले. ते आजीवन अध्ययन व विस्तार विभागामध्ये आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करतांना बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ता म्हणून एम.ए.योगशास्त्र अभ्यासक्रमाच्या डॉ. अनघा देशमुख, प्रा. अर्चना ढोरे, डॉ. वैभव मस्के उपस्थित होते.
डॉ. श्रीकांत पाटील पुढे म्हणाले, स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी सावित्रीबार्इंचे विचार आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. तरुण पिढीला मूल्य संस्कारित शिक्षण देऊन शिक्षकांनी समाजात आदर्श नागरिक घडवावा, जेणेकरून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येतील व सावित्रीबाईंना अपेक्षित असलेला समाज निर्माण होईल.
डॉ. अनघा देशमुख म्हणाल्या, सावित्रीबार्इंनी तत्कालीन समाजातील अनिष्ठ चालीरीती, रूढी – परंपरांच्या निर्मूलनासाठी समाजप्रबोधन केले. स्त्रियांचा सन्मान, त्यांना असलेल्या अधिकारांची जाणीव करून देत त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. आजच्या समाजातील स्त्रियांनी आपले कर्तृत्व ओळखून विकास कार्यात सहभाग नोंदवावा, जेणेकरून सावित्रीबार्इंना अपेक्षित असलेला समाज निर्माण होईल. संचालन प्रा.वैभव जिस्कार, तर आभार प्रा.शुभम पाचखंडे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button