शिवराय कुलकर्णींच्या कथित वक्तव्याविरोधात संताप; शक्ती महाराजांकडून राजकमल चौकात आंदोलनाची घोषणा

भाजपाचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी शक्ती महाराज यांच्याबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यामुळे अमरावतीत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मसानगंज येथील शक्ती महाराज यांच्या समर्थनार्थ येत्या दोन दिवसांत अमरावतीतील राजकमल चौक येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा शक्ती महाराज यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे अधिकृत प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शक्ती महाराज यांचा अपमान झाल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. या कथित अभद्र वर्तनाच्या निषेधार्थ शक्ती महाराजांचे समर्थक आक्रमक झाले असून, आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
या आंदोलनाची अधिकृत घोषणा स्वतः शक्ती महाराज यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाचे नेते आणि प्रवक्ते सातत्याने संत-महंतांचा अपमान करत असल्याचा आरोप केला. “ही केवळ माझी वैयक्तिक लढाई नसून, संपूर्ण समाजाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. अशा प्रकारचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगली असून, आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. येत्या दोन दिवसांत होणाऱ्या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळासह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.



