अकोल्यात धक्कादायक खून; संशयातून लिव्ह-इन नात्याचा रक्तरंजित शेवट

अकोला :
अकोला शहराला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून, संशयातून घडलेल्या खुनाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. मोठी उमरी परिसरात तीन वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या दोन युवकांमधील वाद थेट खुनापर्यंत पोहोचला असून, या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अमोल दिगंबर पवार आणि नितेश अरुण जंजाळ हे दोघे मागील तीन वर्षांपासून संजय नगर, मोठी उमरी येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सुरुवातीला दोघांचे संबंध सुरळीत होते. मात्र अलीकडच्या काळात नात्यात संशय आणि वाद वाढू लागले होते. नितेशला अमोलचे इतर व्यक्तींशी संबंध असल्याचा संशय होता, याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
बुधवारी रात्रीही याच संशयातून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. नितेश जेवण घेऊन घरी आल्यानंतर पुन्हा वाद उफाळून आला आणि तो थेट हिंसाचारात बदलला. रागाच्या भरात नितेशने लाठी-काठीने अमोलच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार वार केले. या मारहाणीत अमोलचा जागीच मृत्यू झाला.
गुरुवारी सकाळी नितेश घराबाहेर धावत येत आरडाओरड करू लागल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमोलच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. सखोल चौकशीत नितेशने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
प्राथमिक तपासानुसार डोक्यावर व चेहऱ्यावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे अमोलचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, नितेशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.



