अमरावती महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गट स्वबळावर; भाजपशी युती न झाल्याचे संकेत

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भाजपकडून युतीची ठोस इच्छा न दाखवण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या प्रिती बंड यांनी दिली आहे.
सिटी न्यूजशी बोलताना प्रिती बंड म्हणाल्या की, “भाजपकडून युतीबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आली नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने अमरावती महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे.” या निवडणुकीत शिवसेना आपली ताकद दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रिती बंड यांनी पुढे सांगितले की, सध्या महानगरपालिकेत शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची क्षमता असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अमरावतीत शिंदे गटाची स्वतंत्र रणनिती आखण्यात आली असून, प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार उभे करण्यात येत आहेत.
भाजप-शिवसेना युती न झाल्याचे संकेत देत त्यांनी स्पष्ट केले की, आगामी निवडणुकीत जनतेसमोर शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडणार आहे.
दरम्यान, भाजप नेते जगदीश गुप्ता यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना प्रिती बंड म्हणाल्या की, “तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र याचा आमच्या निवडणूक तयारीवर कोणताही परिणाम होणार नाही.”
महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता असून, आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचे चित्र आहे.



